पितृपक्ष वाईट कसा?
भाद्रपद कृष्ण पक्षाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या वर्षी (सन २०२३ मध्ये)शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबरपासून शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबरपर्यंत ‘पितृपक्ष’ आलेला आहे. समाजात पितृपक्षासंबंधी बरेच समज-गैरसमज आहेत. ज्याला जन्म आहे, त्याला मृत्यूही आहे. निसर्गातील हे एक शाश्वत सत्य आहे. प्रत्येक जिवंत माणसाच्या ठिकाणी त्याचे शरीर आणि आत्मा असतो. आत्मा म्हणजे चैतन्य! गणिताच्या भाषेत सांगायचे, तर जिवंत माणूस वजा मृत माणूस म्हणजे आत्मा. चालणारी मुंगी आपण चिरडल्यास तिच्यातून काय निघून गेले तर ते चैतन्य-म्हणजेच तिचा आत्मा! भारतीय तत्त्वज्ञानात ‘आत्मा’ ही एक अत्यंत महत्त्वाची कल्पना आहे. माणूस मरण पावला की त्याचे शरीर-पार्थिव नष्ट होते, परंतु आत्मा नष्ट होत नाही. तो अनादि-अनंत, निर्गुण, निराकार आहे. आत्मा निसर्गातील चैतन्यशक्तीत विलीन झाला, की माणसाच्या आत्म्याला सद्गती मिळाली, असे आपल्याकडे समजले जाते.
मृत आप्तेष्टांचे आत्मे भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये आपल्या कुटुंबीयांच्या घरी राहायला येतात, अशी समजूत आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी भाद्रपद कृष्ण पक्षात दररोज महालय-श्राद्ध करावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. हे शक्य नसेल, तर ज्या तिथीला आपले वडील मरण पावले असतील त्या तिथीला आपल्या सर्व पितरांच्या उद्देशाने महालय-श्राद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. हे श्राद्ध करताना पिता म्हणजे वडील, पितामह म्हणजे आजोबा, प्रपितामह म्हणजे पणजोबा, माता म्हणजे आई, पितामही म्हणजे आजी आणि प्रपितामही म्हणजे पणजी यांच्यापैकी जे कोणी मृत असतील, त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करण्यात येतो. इच्छा असेल तर मित्र, गुरू मृत झाल्यावर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही श्राद्ध करता येते. जर योग्य तिथीवर महालय-श्राद्ध करणे शक्य झाले नाही, तर सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही तिथीला केले तरी चालते, असेही सांगितले आहे.
पितरांना संतुष्ट करण्यासाठी जो विधी केला जातो, त्याला ‘श्राद्ध’ म्हणतात. ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द तयार झाला आहे. भारतात श्राद्धप्रथा फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पितरांच्या म्हणजे मृतात्म्यांच्या ठायी पुढील पिढीचे भले-बुरे करण्याचे सामथ्र्य असते, या श्रद्धेतूनच ‘श्राद्ध’ कल्पनेचा उगम झाला असावा, असे विद्वानांचे मत आहे. पण मग भाद्रपद कृष्ण पक्षातच श्राद्ध करण्यास का सांगितले आहे, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ‘मातीच्या गणेश मूर्तीचे’ म्हणजेच पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितले आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, धनसंपत्ती ठेवली त्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद कृष्ण पक्ष हा ‘पितृपक्ष’ म्हणून पाळला जातो. आश्विन महिन्यात शेतातील धान्य घरात येते म्हणून ‘निर्मिती शक्ती- आदिशक्ती’विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवरात्र साजरी केली जाते. नंतर दसरा-दिवाळी हे आनंद व्यक्त करण्याचे सण येत असतात. आपल्या शेतीप्रधान देशाच्या संस्कृतीचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. माणूस जिवंत असतानाच नव्हे तर मृत्यूनंतरही त्याच्याशी माणसासारखे वागावे, ही आपल्या सनातन वैदिक धर्माची शिकवण आहे. निसर्गाचे, पूर्वजांचे ऋण मानणारी आपली संस्कृती आहे. आकाशातील उत्तर गोलार्ध हा देवांचा व दक्षिण गोलार्ध हा पितरांचा समजण्यात येतो.
श्राद्ध कर्म करण्यासाठी ‘अपराण्ह काळा’ला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिनमानाचे (म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालाचे) पाच भाग करावे. त्यांना अनुक्रमे प्रातःकाल, संगवकाल, मध्यान्हकाल, अपराण्हकाल आणि सायंकाल असे म्हणतात. भाद्रपद कृष्ण पक्षात अपराण्हकाली जी तिथी असेल, त्या तिथीचे श्राद्ध त्या दिवशी करावयाचे असते. श्राद्ध हे आपल्या पूर्वजांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी करायचे असते. तसेच ते श्रद्धेने करायला हवे. श्राद्ध हे तीर्थक्षेत्री जाऊन विधीवत करता येते किंवा पशू-पक्ष्यांना अन्न देऊनही करता येते. प्रत्येकाच्या श्रद्धेचा हा भाग असतो. कावळ्याला आत्मा दिसतो अशीही एक समजूत आपल्याकडे आहे. म्हणून माणूस मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला सद्गती मिळाली की नाही, हे कावळ्याने पिंडाला केलेल्या स्पर्शावरून तपासले जाते. पिंडाजवळ आत्मा असेल, तर कावळा पिंडाला स्पर्श करीत नाही. जर आत्म्याला सद्गती मिळाली असेल, तर कावळा पिंडाला स्पर्श करतो, अशी श्रद्धा आहे.
भारतीय संस्कृतीत दान देण्यालाही विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे ‘डोनेशन’ नव्हे! डोनेशन (देणगी) देणाऱ्याचे नाव व त्याने काय देणगी दिली ते जाहीर केले जाते. परंतु ‘दान’ हे गुप्त ठेवायचे असते. दान देणाऱ्याने आपले नाव व आपण काय दान दिले ते जाहीर करायचे नसते. श्राद्धाच्या निमित्ताने पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान देऊन पूर्वजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथाही आहे. गरीबांना मदत व्हावी, हा त्यामागचा उदात्त हेतू आहे. आधुनिक काळात श्रद्धापूर्वक अन्नदान, वस्त्रदान, अर्थदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान, जलदान करूनही पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करून श्राद्ध करण्याची पद्धतही अवलंबिली जात असल्याचे पाहायला मिळते. श्राद्ध घालणे, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.
समज-गैरसमज
पितृपक्षाविषयी समाजात अनेक समज-गैरसमज आढळतात. ‘पितृपक्ष हा वाईट / अशुभ आहे. या काळात विवाह आदी शुभकार्यांची बोलणी करू नयेत, तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची नसते. समजा खरेदी केली, तरी त्याचे पैसे द्यायचे नाही, पैशांची देवघेव करायची नसते,’ असे म्हटले जाते त्यात काहीही तथ्य नाही. पितृपक्ष हा वाईट किंवा अशुभही नसतो. तुम्हीच विचार करा, की या काळात जर आपल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या घरात राहायला येणार असतील, तर ते वाईट कसे असू शकेल? ज्यांनी आपल्याला जन्म दिला, शिक्षण दिले, घर, धन-संपत्ती ठेवली त्यांचे आत्मे पंधरा दिवसांसाठी आपल्या घरात राहायला येणार असतील, तर त्यात अशुभ काय असू शकेल? उलट, आपल्या चांगल्या कामांना व परिस्थितीला पाहून त्या आत्म्यांना आनंद – समाधानच वाटेल ना? त्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा आपल्या प्रत्येक कामाला मिळतील ना? हो, पण जर आपले पूर्वज जिवंत असताना आपण त्यांचे हाल केले असतील, त्यांना त्रास दिला असेल तर मात्र आपणास पूर्वजांच्या आत्म्याची भीती वाटणे साहजिकच आहे. परंतु ९९.९९ टक्के तरी तसे नसते. आपण आपल्या पूर्वजांचा नीट सांभाळ केलेला असतो. त्यामुळे त्यांचे आत्मे आपल्या घरी राहायला आले तरी ते चांगलेच आहे ना? आपल्याला त्याचा आनंदच वाटणार ना?
हे आधुनिक जग स्पर्धेचे आहे, तसेच ते विज्ञानाचेही आहे. श्रद्धा-समज जरूर असावेत, परंतु अंधश्रद्धा – गैरसमज असू नयेत. प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारण भाव समजून घ्यायला हवा. पितृपक्षातील पंधरा दिवस जर आर्थिक व्यवहार ठप्प झाले, तर कसे चालेल? उलट, या दिवसांत आर्थिक व्यवहार अधिक प्रामाणिकपणाने केले, तर आपल्या पितरांना आनंदच होईल ना?
या वर्षापासून आपण आपल्यात असा चांगला बदल घडवूया. पितृपक्षातील हे दिवस अशुभ न मानता पितरांचे स्मरण करूया. श्रद्धेने समाजातील गरीब गरजू लोकांना दान स्वरूपात मदत देऊन आपल्या पितरांचे श्राद्ध करूया म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपणास नक्कीच मिळतील!
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
दा. कृ. सोमण
(लेखक पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत.)
दा.कृ.काका खुप छान माहिती
अतिशय सुंदर महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही काका
धन्यवाद 🙏