मंडळ कला: पूर्वजांची देणगी
काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली मंडळ कला आज पुन्हा नव्याने तरुणांना आकर्षित करताना दिसते. आजच्या धकाधकीच्या काळात या कलेचा उपयोग मानसशास्त्रज्ञ ‘आर्ट थेरपी’ म्हणून करताना दिसतात. शिकायला अत्यंत सोपी अशी ही कला असून या कलेची साधना मनावर योग्य परिणाम करणारी म्हणून ओळखली जाते. सर्व चिंता दूर करून मन एकाग्र करायला शिकवणारी कला म्हणून आज याकडे पाहिले जाते.
मंडळ कलाकृती म्हणजे काय?
मंडळ म्हणजे संस्कृतमध्ये गोल आकार. मूळ मंडळ कलाकृतींची निर्मिती ही एका बिंदूपासून पुढे वाढत जाणाऱ्या गोलाकारात केलेली आढळते. त्यामध्ये एका छोट्याशा बिंदूतून आठ दिशांना गेलेले आठ आरे आणि त्या सभोवती लहान ते मोठ्या होत गेलेल्या वर्तुळांमध्ये एकाशेजारी एक असे योजिलेले त्रिकोण, चौकोन, गोल किंवा अर्धगोल तसेच अनेकविध आकारांच्या महिरपींच्या पुनरावृत्तींनी नटलेले नमुने असतात. या कलाकृती आकाराने कितीही मोठ्या वाढवता येऊ शकतात. त्यात अनेक प्रकारचे नक्षीकाम करायला वाव असतो. प्रतीकात्मक, भौमितिक आणि आलंकृत आकारांची सांगड घालत केलेल्या या कलाकृती चित्रकाराच्या मानसिक स्थितीचा आरसा असू शकतात. तसेच काही मंडळ कलाकृती या वर्णनात्मक असू शकतात. जाणकार त्या वाचू शकतात.
मंडळ कलेच्या निर्मितीचा इतिहास काय सांगतो?
प्रचलित असलेली, गोलाकार नक्षीकामात विकसित झालेली मंडळ कला इ.स.पू. पाचशे वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंनी आशिया खंडातील भ्रमणकाळात तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या गुहेतील छतावर, भिंतींवर, मंदिरात किंवा स्तूप मंडपात केलेल्या कोरीव कामात आढळून येते. नेपाळ, तिबेट, भारत, चीन, मलेशिया, इंडोनेशिया व भूतान येथे या कलाकृती भल्या मोठ्या आकारात भिंतींवर व छतावर आजही अभ्यासायला मिळतात.
ऋग्वेदात ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी निर्मिलेल्या तांत्रिक कलाकृतीचा एक प्रकार या मंडळ कलाकृतीसारखाच होता, असे अतिप्राचीन इतिहास सांगतो. या अतिप्रचलित चिन्हात्मक कलाकृतीत स्त्री म्हणजे प्रकृती (शक्ती) म्हणजे उलटा समभुज त्रिकोण, तर सरळ समभुज त्रिकोण म्हणजे पुरुष (शिव); या दोघांच्या मीलन रचनेतून निर्मिलेल्या चांदणीत विश्वाचे प्रतीक असलेला एक मध्यबिंदू हे मूळ स्वरूप होते. अशा या चिन्हाच्या तत्त्वाभोवती गोलाकार त्रिकोण गुंफून निर्मिलेल्या मंडळ कलाकृती या अतिप्राचीन बुद्धपूर्व काळात उदयास आलेल्या यंत्र कलाकृती प्रकारात मोडतात. शिव यंत्र, श्री यंत्र, शनी यंत्र अशा अनेकविध प्रतीकात्मक चिन्हांच्या अर्थाने नटलेली अनेक यंत्रे पूजेत ठेवलेली पाहायला मिळतात. धन, यश, कीर्ती व सुख प्राप्तीसाठी निर्मिलेल्या या मंडळ कलाकृती कधी चौकोनात बसविलेल्याही आढळतात. याशिवाय, अतिप्राचीन काळात स्त्रियांनी रांगोळी माध्यमातूनही मंडळाकृतींचे रेखाटन मोघम स्वरूपात केलेले आढळते.
अवकाशतील ग्रहकक्षा प्रतीत करणाऱ्या लंब वलयांकृती रेखांच्या रचनेतून निर्माण झालेल्या कलाकृती, तसेच विकसित होत जाणाऱ्या कमलाकृती चांदणी चिन्हांचा वापर अगदी आजही दक्षिण भारतात स्त्रिया मुख्य दरवाजासमोर पांढऱ्याशुभ्र रांगोळीच्या माध्यमातून सजावटीसाठी करताना दिसतात.(किंबहुना हिंदू संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून तांदळाच्या पिठाच्या रेषांनी प्रतीकात्मक चिन्हांच्या साहाय्याने गोलाकार स्वरूपात विकसित होत जाणाऱ्या रांगोळ्यांमधून या कलेची सुरुवात झाली असावी, असे वाटते. तद्नंतरच्या काळात बौद्ध भिक्षूंनी ही कला आणखी विकसित केली असावी.)
मंडळ कलाकृतींचे अनेकविध प्रकार…
१) कालचक्र मंडळाकृती
२) कमलाकृती मंडळाकृती
३) मंत्रात्मक मंडळाकृती
४) बुद्ध धार्मिक मंडळाकृती
५) श्री यंत्रात्मक मंडळाकृती
६) तांत्रिक मंडळाकृती
७) मंजुश्री मंडळाकृती
८) तिबेटियन यिन-यांग मंडळाकृती
९) अंतरिक्ष मंडळाकृती
१०) ओंकारात्मक मंडळाकृती
११) भौमितिक आकारातील मंडळाकृती
१२) चिन्हात्मक मंडळाकृती
१३)अक्षरात्मक मंडळाकृती
१४) प्रतीकात्मक मंडळाकृती
१५) ध्यानात्मक मंडळाकृती
१६) मूळ घटकस्वरूप मंडळाकृती इ. इ.
मंडळ कला व तिचा उपयोग
१) अध्यात्मातील प्रगतीसाठी किंवा ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी चित्त एकाग्र करताना विविध आकारांच्या गोलाकार मांडणीचे चित्र मनाने डोळ्यांसमोर रचत गेल्यास मनःशांती लाभते.
२) मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मंडळ कला ही ‘हीलिंग’साठी म्हणजे अस्थिर मानसिक स्थितीवर औषध म्हणून वापरण्यात येते.
जसे की – शाळेत शिकणाऱ्या मुलाची एकाग्रता वाढविण्यासाठी, वृद्ध व्यक्तींना एक सकारात्मक विरंगुळा म्हणून, मानसिक अस्थैर्य जाणवणाऱ्या महिलांसाठी, कामाच्या व्यापात संगणकाच्या सतत वापराने मनावर आलेली मरगळ दूर होण्यासाठी किंवा सततच्या कामांचे मानसिक दडपण येणाऱ्यांसाठी एक सकारात्मक मानसिक बदल घडवून आणण्यासाठी या कलेचा उपयोग मानसशास्त्रज्ञ हल्ली करू लागले आहेत. तसेच विस्मरणाची सुरुवात झालेल्या वृद्धांना स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यात या कलेची मदत होते, असाही शोध नव्याने लागला आहे.
३) सजावटीसाठी या कलेचा उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. वॉल आर्टमध्ये किंवा इतर घरसजावटीच्या वस्तूंवर, तसेच टीशर्ट अथवा साडीवरसुद्धा ही डिझाइन्स उत्तम पद्धतीने काढली अथवा प्रिंट केली जात आहेत.
मंडळ कलाकृतीचा आजच्या काळात विविध दृष्टिकोनातून विकास कसा होत आहे?
आज अनेक चित्रकार या कलेचे आधुनिक प्रयोग करण्यात मग्न आहेत. जसे झेनटँगल मंडळ कला व डूडल मंडळ कला हे उपप्रकार जन्माला येत आहेत.
झेनटँगल मंडळ कला ऊर्फ झेंडळा कला म्हणजे काय?
झेंडळा कला ही प्रामुख्याने परदेशी चित्रकारांनी विकसित केल्याची उदाहरणे सापडतात. जिथे कलेला मर्यादा नाही, मनाला येईल तसे पॅटर्न बनवत जाणे व कधी गोलात तर कधी गोलाला भेदून त्यात विविध पॅटर्न भरणे अशी जणू मनाचा आरसा बनलेली ही कला अमर्याद आहे. यात रेखेला व तिच्या घाटदार वळणांना खूप महत्त्व आहे. त्यातून भावना प्रतीत होत जातात आणि झेंडळा विकसित होत जाते.
डूडल मंडळ कला म्हणजे काय?
यात गोलाकार पट्ट्यांमध्ये आपल्या मनात येणारी दृश्ये रेखाटत जाणे, काळ्या किंवा पांढऱ्या रेखाटनात पाने, फळे, फुले, पक्षी, प्राणी, माणसे, डोंगर, दऱ्या वगैरे निसर्गातील कुठल्याही आकृतींचा तसेच नक्षीकामाचा समावेश असू शकतो. मन नेईल तिकडे जात राहणे आणि ते कागदावर उतरवत जाणे यातून मन एकाग्र होत जाते आणि त्यातून चिंतामुक्तीचा आनंद मिळू शकतो.
नवीन माध्यमातून व्यक्त होणारी मंडळ कला :
अतिप्राचीन काळात रांगोळी माध्यमातून किंवा प्राचीन काळात नैसर्गिक रंग आणि छिन्नी व हातोडी या माध्यमातून विकसित झालेल्या कलेला आता नवीन माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळत आहे.
१) कागद व पेन : यात अगदी साध्या कोऱ्या कागदावर कुठल्याही रंगाच्या पेनाने एका बिंदूपासून आठ आरे चौफेर खेचून मध्यभागी लहान ते मोठी वर्तुळे बनवून त्यात प्रतीकांची एकसारखी जुळणी करत जाणे. जितके सुचेल तितके वाढवत जाणे. असे एकरंगी रेखाटन खूप सुंदर दिसते. पण यात रेषेची जाडी नियमित ठेवावी लागते.
२) कागद, पेन व रंग : वरीलप्रमाणे रेखाटन झाल्यावर त्यात स्केचपेन्सनी अथवा ब्रश व पोस्टर रंग किंवा अॅक्रेलिक रंगांच्या माध्यमातून एकसारखा रंग भरणे. हा एक ध्यानक्रियेचा प्रकार समजला जातो.
३) सजावटीचे (डेकोरेशन) साहित्य : वरीलप्रमाणे रेखाटन व रंग भरून झाल्यावर अथवा रंग न भरताही त्यावर सजावटीचे साहित्य जसे की टिकल्या, आरशाचे तुकडे आणि खडे यांनी सुशोभित (डेकोरेट) करून कलाकृती अधिक उठावदार बनवणे.
४) भिंत आणि रंग : भिंतीवरील जागेनुसार रेखाटन विकसित करीत जाणे व त्यात तैलरंग अथवा अॅक्रेलिक रंग भरणे. आजकाल भिंतीवर डिझाइन करण्यासाठी ‘व्हर्टिकल प्रिंटिंग’ या माध्यमाचाही विकास झालेला आहे, त्याचीही मदत घेता येईल. त्यामुळे शिडीवर चढून मोठ्या कलाकृतीवर रंगकाम करण्याचा धोका टळतो.
५) कापड आणि रंग : साड्या, ओढण्या, टीशर्ट, पडदे, उशीचे अभ्रे इत्यादी प्रकारच्या कापडावर रेखाटन करून त्यात फेविक्रीलचे रंग भरून अथवा स्क्रीन प्रिंट करून घेता येते. तसेच चित्र कागदावर काढून त्याची मोठ्या प्रमाणात कापडावर पुनर्निर्मिती करायची असल्यास ऑफसेट मशीनवरही प्रिंटिंग करून घेता येते.
६) कॅनव्हास आणि रंग : घर किंवा ऑफिसमध्ये सजावट म्हणून कॅनव्हासवर केवळ रेखाटन अथवा तैलरंगात किंवा अॅक्रेलिक रंगात चित्रनिर्मिती करून त्याची फ्रेम बनवून भिंतीवर लावू शकतो. त्यात ‘रिलीफ वर्क’ करून त्याला अजून उठावदारही करता येते.
७) लाकूड आणि पॉलिश रंग : लाकडावर रेखाटन व कोरीव काम करून त्यात निरनिराळ्या पॉलिशमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगच्छटांनी अधिक सुशोभित करू शकतो.
८) सिरॅमिक म्युरल : भिंतीवर अथवा जमिनीवर मंडळ कलाकृतींचे रेखाटन करून त्यात सिरॅमिक टाइलचे विविध रंगांतले तुकडे चिकटवून म्युरल बनवता येते.
९) पारदर्शक काच आणि रंग : विविध प्रकारच्या काचेच्या तावदानांवर अथवा छताच्या भिंतीवरील लॅम्पशेडच्या काचेवर काळ्या रंगाच्या रेषांनी मंडळ कलाकृती रंगवून आत पारदर्शक काचेवर रंगवता येणाऱ्या रंगांनी सुशोभित करू शकतो.
१०) रांगोळी आणि रंग : घराच्या मुख्य दारासमोर पांढऱ्याशुभ्र रांगोळीने मंडळ कलाकृतींचे रेखाटन विकसित करून त्यात विविध रंग भरून सणावाराची रंगत वाढवता येते.
१२) अॅल्युमिनियम शीट, बॉलपेन आणि पारदर्शक रंग : ३ मि.मी. गेजच्या अॅल्युमिनियम फॉइलवर (हार्डवेअरच्या दुकानात मिळते) बॉलपेनच्या पॉइंटने दाबून मंडळ कलाकृतींचे कोरीव काम करून त्याला हवा तसा उठाव देऊन पारदर्शक रंगांच्या मदतीने मेटल क्राफ्ट फ्रेम करून भिंतीवर लावू शकतो.
१३) डाळी आणि कडधान्ये : विविध रंगांच्या डाळी व कडधान्ये कागदावर मंडळ रेखाकृतीवर चिकटवून बनविलेली सुंदर कलाकृती भेटवस्तू म्हणूनही देता येईल.
१४) थाळी डेकोरेशन : ओवाळणीच्या थाळीत ड्रायफ्रूट्सची सुंदर रचना मंडळ कलाकृतीनुसार करता येईल.
१५) विणकाम : हेही एक अत्यंत प्रचलित, पण करायला कठीण असे माध्यम असून यात कापडावर विविध धाग्यांनी अथवा क्रोशाच्या धाग्यांनी विणून मंडळ कलाकृतीची निर्मिती करता येते.
१६) पातळ रंगीत कागद : पातळ रंगीत कागदांच्या पट्ट्या विशिष्ट प्रकारे (पेपर क्विलिंग तंत्राने) गोल गुंडाळून मंडळ कलाकृतींचे नक्षीकाम करू शकतो.
१७) पॅचवर्क : विविध रंगांच्या कापडाचे तुकडे गोलाकार जोडत जाऊन केलेले पॅचवर्क जमिनीवर गालिचासारखे पसरून गृहसजावटीत भर टाकू शकतो.
या आणि इतर अनेक प्रकारे कल्पकता वापरून घराच्या घरी मंडळ कलेची साधना करण्याने मन शांत आणि स्थिर होण्यास मदत होते. ही कला म्हणजे गृहिणींना मिळालेली पूर्वजांची देणगीच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुमेधा वैद्य
(लेखिका मंडळ कला विषयाच्या अभ्यासक आहेत.)
खूप छान माहिती मिळाली. असं च नव नवीन विषय बद्दल आम्हाला माहिती मिळाली तर खूप छान वाटेल.
धन्यवाद.