शिवरायांचे बालपण
जग गाजविणाऱ्या व्यक्तींचे बालपण कसे होते, या विषयी प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी आपल्यालाही अशीच उत्सुकता नेहमीच असते. याबाबतीत आपण भाग्यवान आहोत. ऐन शिवकालात भोसले राजघराण्याच्या खूपच जवळच्या संबंधातील एका सुविद्य व्यक्तीने शिवाजी महाराजांचे चरित्रच लिहून ठेवले आहे. या व्यक्तीचे नाव परमानंद गोविंद नेवासकर. त्याने लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे नाव आहे ‘शिवभारत’! या ग्रंथात लिहिलेल्या शिवकालीन घटना पूर्ण विश्वसनीय मानल्या जातात. याच ‘शिवभारत’ ग्रंथात शिवाजी महाराजांचे बालपण परमानंदांनी फारच सुरेख शब्दांत व वास्तव स्वरुपात लिहिले आहे. शिवबांचे रांगत्या वयातील गोजिरवाणे रूप आणि त्यांच्या बाळलीला हृद्य आणि लोभस स्वरूपात डोळ्यापुढे दिसू लागतात. लहान बाळे तुमच्या-आमच्या घरी अशीच रांगतात, खेळतात, हसतात अन् रडतातही. शिवबा आपल्या आईची अन् दाईचीही नजर चुकवून अंगणातील माती खात असे! तो खूप खेळकर होता, खोडकरही होता अन् प्रसंगी जोरदार स्वरात रडणारा हट्टी मुलगाही होता. त्या काळातील पद्धतीप्रमाणे शिवबावर वेळोवेळी धार्मिक संस्कारही केले जात होते. एक गोष्ट फारच मार्मिक वाटते, ती म्हणजे शिवबाच्या पाचवीला तलवार पुजली होती आणि नांगरही पुजला होता. शिवबाचे प्रेम पुढच्या काळात भवानीदेवीप्रमाणे तलवारीवरही होते आणि बलरामाप्रमाणे नांगरावरही होते. या राजाने आपले सारे आयुष्य मावळी सैनिकांकरिता आणि शेतकऱ्यांकरिता वाहून घेतलेले आपण इतिहासात पाहतोच आहोत.
शिवबाचे वय जसे मोठे होत गेले तसे त्याचे शिक्षणही वाढत गेले. राजा अतिशय तल्लख बुद्धीचा होता. लिहिणे, वाचणे अन् चांगले- चांगले ऐकणे आणि चांगले- चांगले बोलणे त्यांच्या अंगी भिनत गेले. त्यातूनच एक भावी तरुण नेतृत्व सह्याद्रीतील शूर युवकांना मिळणार होते आणि ते मिळाले. त्यांच्या तैलबुद्धीबद्दल परमानंदांनी लिहून ठेवले आहे की, एकदा शिकवलेली गोष्ट हा बाळराजा अगदी चटकन शिकतो. इतकेच नव्हे तर, त्यात तरबेज होत जातो. घोड्यावर बसून दौड करणे, हत्यार चालविणे आणि हत्तीवर बसून माहुताप्रमाणे हत्ती चालवणे या गोष्टींत शिवबा तरबेज होत गेला.
स्वाभाविकरीत्याच आईचे संस्कार होतच असतात. शिवबावरही ते होत गेले. स्वतः जिजाऊसाहेब लोकांचे भांडणतंटे सोडवावयास अन् त्याचे निकाल द्यावयास न्यायगादीवर बसत. त्या भांडणातील दोन्हीही बाजू त्या ऐकून घेत व त्यावर निर्णय करीत. असे जिजाऊसाहेबांनी केलेल्या तंट्यांचे निवाडे आज सापडलेले आहेत. अर्थात, अशा न्यायनिवाड्यात आऊसाहेबांचे वागणे, बोलणे आणि समजूतदारपणा शिवबांना प्रत्यक्ष अनुभवावयास मिळत होता. तो संस्कार त्यांच्यावरही घडत गेला. त्यातूनच मराठी मुलखाला एक न्यायी, नीतिवान आणि धर्मशील राजा मिळाला.
अनुयायी कसे मिळवावेत आणि त्यांना शिकवून त्यांच्याकडून लहानमोठी जबाबदारीची व अवघड कामे कशी करून घ्यावीत हेही शिवबाराजे शिकले. हे नेतृत्वाचे आणि संघटनेचे गुण लहानपणापासूनच या राजाच्या रोमरोमी उतरले. शिवबांबद्दल काही पत्रांतून फारच मार्मिक उल्लेख सापडतात. एका पत्रात म्हटले आहे. ‘राजश्री तो ऐसे की माणसाचे माणूस वलखिताती’, म्हणजे कार्यातला माणूस अन् माणूस महाराज अचूक ओळखत होते आणि जोडीत होते. त्यामुळेच त्यांच्या स्वराज्याच्या उद्योगाबद्दल जनतेत प्रेम, निष्ठा आणि दराराही निर्माण होत होता. एका पत्रात उल्लेख आहे की, ‘हे राज्य म्हणजे श्रींच्या वरदेचे राज्य.’ म्हणजेच लोकांची स्वराज्यावर व राजावर देवासारखी भक्ती आणि कर्तव्यनिष्ठा जडत गेली. यातूनच मराठी स्वराज्याचे नॅशनल कॅरॅक्टर म्हणजेच राष्ट्रीय चारित्र्य उमलत आणि फुलत गेले.
लष्करी बाबतीत त्यांच्यापुढे साक्षात उभा होता तीर्थरूप शहाजीराजांचा ताजा इतिहास. इ.स. १६२४ च्या ऑक्टोबर महिन्यात शहाजीराजांनी दिल्लीच्या मोगली फौजेचा आणि विजापूरच्या आदिलशाही फौजेचा एकाचवेळी भातवडीच्या एकाच रणांगणावर एकदम पराभव केला. भातवडी हे ठिकाण अहमदनगरच्या पूर्वेस २० कि.मी.वर आहे. या भातवडीच्या युद्धात शहाजीराजांची फौज शत्रूपक्षापेक्षा खूपच कमी होती. तरीही कमीत-कमी वेळात त्यांनी अफाट शत्रूचा अफाट पराभव केला. हा गनिमीकाव्याचा अचाट विजय होता. आपल्याच वडिलांनी करून दाखविलेला हा अचाट गनिमीकावा आणि अशीच शहाजीराजांची अन्यही पराक्रमी कृत्ये शिवबांना समजत होती. त्यातूनच एक अचाट गनिमीकावा करणारा आणि अफझलखान, फत्तेखान, शाहिस्तेखान, बहादूरखानयांच्यासारख्या प्रचंड बळाच्या अहिमहिंचा पार धुव्वा उडविण्याचे कौशल्य शिवाजीराजांनी घडवून दाखविले. इतकेच नव्हे तर कोकणच्या समुद्रात आणि बंदरात त्यांनी पाश्चात्त्य फिरंग्यांना आणि इंग्रजांना जबर तडाखे दिले. बाळपणीच हे बाळकडू त्यांना मिळाले.
मातीचा गोळा ओला असतानाच त्याला आकार देता येतो, हे अचूक ओळखूनच जिजाऊसाहेबांनी अगदी लहानपणापासूनच शिवाजीराजांवर संस्कार केले. त्यांच्या नावाने जी राजमुद्रा तयार केली, तीच अत्यंत उदात्त, उत्तुंग आणि उत्कट महत्त्वाकांक्षेची द्योतक होती ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता’. केवढा उत्तुंग ध्येयवाद या राजबाळापुढे ठेवला गेला पाहा ! शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा प्रथम उमटविलेला कागद (आज्ञापत्र) सापडलाआहे. तो १६३९ सालचा, म्हणजे त्यांचे वय त्या वेळी फक्त नऊ वर्षांचे होते. हीच उमलत गेलेली त्यांची महत्त्वाकांक्षा इ.स. १६७४ मध्ये सोन्याच्या सार्वभौम सिंहासनावर आरूढ झालेली आपण इतिहासात पाहतो आहोत. त्या राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊसाहेबांना वंदन करताना महाराज म्हणाले, “आऊसाहेब, हे सर्व तुमच्या आशीर्वादाने जाहले.” आईच्या आशीर्वादापुढे शिवाजीराजांना सारे काही तुच्छच वाटत होते. अशी मातृभक्ती आणि पितृभक्ती जगाच्या इतिहासात तुरळकच सापडेल. महाराजांचा प्रत्यक्ष रणांगणावरती पहिला पराक्रम आणि तोच पहिला विजय झाला बिलसर – सासवडच्या लढाईत (दि. ८ ऑगस्ट १६४८), म्हणजे महाराज त्या वेळी फक्त १८ वर्षांचे होते. या पराक्रमी विजयापासून पुढे ते सतत विजयीच होत गेले. स्वातंत्र्याकरिता चार बलाढ्य परकीय सत्तांशी आणि अनेक स्वकीय स्वार्थी स्वजनांशी झुंज मांडणारा अन बालवयातच पहिला विजय मिळविणारा असा बाळराजा, असा बाळनेता, असा बाळसेनापती, असा बाळमुत्सद्दी, असा बाळराजनीतिज्ञ जगाच्या पाठीवर हा पहिलाच. राजा शिवछत्रपती !
या बालवयापासून पुढे अनेक नामवंत शत्रूचा पराभव करणारा हा राजा खरोखर आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाचा सेनापती ठरेल. म्हणजेच शिवाजीराजांनी केवळ चंद्रराव मोर, बाजी घोरपडे, जसवंतसिंग राठोड इत्यादींसारख्या बलाढ्य सेनानींचा पाडाव केला, पण हे सेनानी स्वकीयच होते; परंतु शाहिस्तेखान, सिद्दीखवासखान, दाऊदखान खुरेशी, बहादूरखान, हेन्री थॉर्प, हेन्री वेल्स, व्हिसेंती अल्व्हा, हुसेनखान मियाना इत्यादी भारताबाहेरून आलेल्या पण महाराजांशी लढलेल्या जबरदस्त परकीय सेनापतींचाही पराभव महाराजांनी एकेकदा वा अनेकदा केला, हे ऐतिहासिक सत्य आहे. तर महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सेनापती म्हटले तर ते सत्यच ठरेल.
या साऱ्या विवेचनातून एकच गोष्ट दिसेल की, एक बालवयाचा मुलगा एक असामान्य दिग्विजयी सेनानी होतो. आम्ही त्याच्या रक्ताचे आणि बुद्धीचे वारस ! आज आम्ही कुठे आहोत ?
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
बाबासाहेब पुरंदरे