‘‘मूर्ख माणसांशी गाठ पडली तर काय करावं?’’ हा माझा प्रश्न.
‘‘त्याला टाळावं.’’
‘‘त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.’’
‘‘मूर्ख म्हणून सोडून द्यावं.’’
एक झापड मारावी.
“अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवाव आणि त्याच्या मुर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.”
प्रश्न एक. उत्तर अनेक!
सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे.
‘‘एक साधा प्रश्न माझा, लाख येत उत्तरे…हे खरे की हे खरे, की हे खरे.”
सगळी उत्तर खरी असली तरी आणखी एक वेगळी उत्तर उरतचं.
ते उत्तर माझ. ते माझ उत्तर म्हणून वेगळं आहे असं मला म्हणायचं नाही. तर ह्या सर्व उत्तरांत ते उत्तर अपवादच ठरणार आहे. ह्याचं कारण मुर्खामूर्खातही अपवाद असतात.
‘टीटी’ म्हणून एक अपवाद आहे.
टीटी म्हणजे त्र्यंबक टिळक.
टीटी इतका मूर्ख माणूस मी सध्याच्या जगात पाह्यला नाही. मी तो कधी भेटेल ह्याची वाट बघतो. कारण हा मूर्ख, येडपट माणूस मला आवडतो.
कोणत्या कामाच्या संदर्भात हा प्राणी मला प्रथम भेटला ते आता आठवत नाही. पण ठरवलेलं काम संपल्यावर जाताना त्यान आपल व्हिजिटिंग कार्ड मला दिलं आणि तो म्हणाला.
‘‘हे कार्ड तुम्ही नक्की सांभाळून ठेवाल.’’
तो गेला, जाताना तो असं का म्हणाला असेल ह्याचा मी विचार करु लागलो. मग त्याचं कार्ड मी बारकाईनं पहायला सुरुवात केली. चारचौघांसारखंच त्यानं आपल नाव कार्डावर छापल होतं. अगदी सहज म्हणून मी त्या कार्डाची मागची बाजू पाह्यली. त्याबरोबर त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला. कार्डाच्या मागच्या बाजूला त्यानं अत्यावश्यक असे महत्त्वाचे दहा-पंधरा फोन नंबर छापलेले होते. महापालिकेची मुख्य हॉस्पिटल्स, अॅम्बुलन्स, शववाहिका, फायर ब्रिगेड, रक्तदान केंद्राबरोबरच काही ब्लड बँक्स असे अनेक नंबर त्यात होते.
मी खरोखरच ते कार्ड हाताशी येईल अशा ठिकाणी ठेवले.
एखाद्या व्यक्तीची आणि आपली गट्टी जमली की त्याचे व्हिजिटिंग कार्ड आपण सांभाळतोच असे नाही. पण त्र्यंबक टिळकचं कार्ड मी सांभाळलं ते दर्शनी भागांपेक्षाही मागच्या बाजूसाठीच.
टीटी वेगळाच होता.
केव्हातरी तो आणि मी एका हॉटेलात गेलो. चहापाण्यापेक्षा गप्पा महत्त्वाच्या होत्या. बाहेर पडताना टीटीनं काउंटरवर पाचाची नोट टाकली.
‘‘साहेब, ही नोट खोटी आहे.’’
कॅशियर असं सांगताच आम्ही चक्रावूनच गेलो. वादविवाद करण्यात काही अर्थच नव्हता. टीटीनं दुसरी नोट पुढे केली.
आम्ही हॉटेलच्या बाहेर पडलो. टीटी क्षणभर थांबला. त्यानं खिशातून लाइटर काढला आणि ती नोट चक्क जाळून टाकली.
‘‘तू हे काय करतोयस?’’ असं मी मधेच म्हणालोही.
टीटी म्हणाला,
‘‘मी ही नोट सहज कुठंही खपवू शकलो असतो. एखादा ‘मोरु’ सहज भेटला असता.
‘‘मग?’’
‘‘ही नोट अशीच सर्क्युलेशनमध्ये राह्यली असती आणि कदाचित एखाद्या अतिशय नाडलेल्या माणसाच्या हातात गेली असती. कदाचित त्या नोटेसहित तो एखाद्या केमिस्टकडे गेला असता आणि केमिस्टन औषध नाकारल असत तर?’’
‘‘पण टीटी…’’
‘‘पाच रुपयाची नोट जाळण्याइतपत परमेश्वरानं मला ऐपत दिली आहे.’’
‘‘मी तेच विचारणार होतो. ही नोट शंभराची असती तर?’’
टीटी म्हणाला,
‘‘जो परमेश्वर मला पाचाची नोट जाळायची ऐपत देतो तोच मला शंभराची नोट जाळण्याचीही ऐपत देईल. भविष्यकाळात मी सत्कृत्य करू शकेल की नाही, ह्याच्याशी मला आज कर्तव्य नाही. मी जर आज चांगली गोष्ट करु शकत असेन, तर का करायची नाही?’’
माझ्याजवळ उत्तर नव्हतं.
टीटीनं असेच एकदा मला चक्रावून टाकलं. आम्ही टॅक्सीसाठी थांबलो होतो. दोघांनाही हव्या असलेल्या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता. आम्ही ठरवून दांड्या मारल्या होत्या आणि नाटकाला गेलो होतो. प्रयोग सुटला होता. पोट भुकेनं कडाडल होतं. वाहनाची नितांत गरज होती आणि मुंबईचे टॅक्सीवाले बेपर्वाईनं न थांबता जात होते.
थिएटरपासून हॉटेल, चालत गेलो तर लांब, पण टॅक्सीवाल्यानं अकारण नकार द्यावा अशा अंतरावर आणि तेवढ्यात एक कोरी करकरीत टॅक्सी इशारा करताच थांबली.
आम्ही टॅक्सीत बसलो.
टॅक्सी चालू केल्याबरोबर टॅक्सीवाला गाऊ लागला. ह्यानं ऐन दुपारी चढवली की काय असं म्हटलं. गाता स्टिअरिंग गच्च धरुन तो जागच्याजागी नाचू लागला. येणाऱ्या जाणाऱ्या इतर टॅक्सीवाल्यांना मध्येच अभिवादन करीत राहिला. मग गाणंं थांबवून तो समोरच्या आरशातून आमच्याकडे पाहून बोलू लागला.
‘‘साब, भगवान देता है तब छप्पर फाडके देता है.’’
‘‘आज बहोत खुष दिखते हो?’’
‘‘ऐसाही’’
हॉटेलजवळ टॅक्सी उभी राह्यली. तोपर्यंत त्यानं आनंदाच कारण सांगितलं नाही. गाडीतून आम्ही उतरण्यापूर्वी त्यानं, ‘‘साब, जरा ठहरो’’ असे म्हणत आमच्या दोघांच्या हातावर दोन दोन पेढे ठेवले आणि आम्ही पेढयांच कारण विचारायच्या आत तो आतून फुलून येत म्हणाला, ‘‘आज इस गाडीकी डिलीव्हरी मिल गयी. आर.टी. ओ पासिंग किया और पहला पॅसेंजर आप है, मुह मीठा करो.’’
टीटी क्षणभर थबकला आणि टॅक्सीवाल्याला म्हणाला, ‘‘हम अभी आयेंगे, जरा ठेहरना.’’
टीटीनं समोरच्या दुकानातून सहा-सहा रुपयांचे दोन रुमाल विकत घेतले आणि ते टॅक्सीवाल्याला देत तो म्हणाला,
‘‘हमारी तरफसे इस खुशीके अवसरं पर.’’
जेवताना मी त्याला विचारले, ‘‘हा टॅक्सीवाला तुला पुन्हा भेटेल का?’’
‘‘न भेटण्यातचं मजा आहे आणि भेटला तर तो मला ओळखणार नाही.’’
‘‘तू ओळखशील?’’
‘‘नक्कीच अर्थात नंबरवरुन MMQ 5308 अर्थात मी ओळख देणार नाही.’’
‘‘का?’’
त्यातच गंमत आहे.
टीटीच्या घरी आमचं एकदा टोळक जमलेलं. गप्पाटप्पा आणि वगैरे वगैरे चाललेल तेवढयात फोन वाजला.
‘‘हॅलो, नो नो, आय अॅम टिळक’’
फोन खाली ठेवत तो म्हणाला, ‘‘डॉ. सप्तर्षींची चौकशी करीत होता बिचारा.’’
मग फोन आणि राँग नंबरवर न संपणारी निष्फळ चर्चा झाली. कुणीतरी मुंबईच्या फोनची नवी व्याख्या ऐकवली.
‘‘हाफ द प्यूपल आर वेटींग फॉर न्यू कनेक्शन्स अॅण्ड रिमेनिंग फॉर डायल टोन.’’
तेवढयात पुनः फोन वाजला. टीटीनं सांगितलं, ‘‘नो सर, धीस इज नॉट डॉ. सप्तर्षीज, व्हीच नंबर यू आर डायलिंग? ओ.कें’’
आमच्यापैकी एकान गप्पागोष्टीत व्यत्यय नको म्हणून रिसिव्हर उचलून ठेवला. टीटीनं तो लगेच हातात घेतला आणि एकशेसत्त्याण्णव नंबर फिरवला. मग त्यानं ऑपरेटरला डॉ. सप्तर्षींचा जुना नंबर सांगून बदललाय का ते विचारले. ‘‘थँक यू’’ म्हणत त्यान फोन ठेवून दिला.
टीटीनं फोन ठेवताक्षणी परत बेल वाजली, पुनः राँग नंबरवरच फोन आला होता. ह्या वेळेला मात्र टीटी म्हणाला,
‘‘जस्ट अ मिनिट सर, मी टिळकच बोलतोय. पण तुम्हाला मी. डॉक्टर सप्तर्षींचा बदलेला नंबर सांगतो लिहून घ्या.
फोन खाली ठेवत टीटी म्हणाला,
‘‘त्या बिचाऱ्यावर चिडण्यात काय मतलब? हवा तो नंबर मिळाला नाही की फोन करणारा आपल्यापेक्षा जास्त परेशान झालेला असतो. एक तर त्याचे पैसे जातात. त्यात आपण खेकसल्याच्या यातना.’’
तर असा हा एक मूर्ख माणूस ह्या युगात न शोभणारा.
काही ना काही स्वतःला पेलतील अशी माणुसकीची मूल्य जपणारा.
टीटीचे हे मुर्खपणे तुम्हाला जर आवडले असतील तर त्याची ओळख करुन घेणार का? फोन नंबर सांगु?
नकोच पण समजा राँग नंबर लागला तर? तर सगळच काही टीटीसारखे नसतात.
पैसे जातात आणि एखाद्या अज्ञात माणसाच्या अकारण शिव्या खाव्या लागतात.
खुपचं छान मॅन भरून आलं……????
जगातली काही माणसे टीटी सारख वागली तर …………..
जो परमेश्वर मला पाचाची नोट जाळायची ऐपत देतो तोच मला शंभराची नोट जाळण्याचीही ऐपत देईल. भविष्यकाळात मी सत्कृत्य करू शकेल की नाही, ह्याच्याशी मला आज कर्तव्य नाही. मी जर आज चांगली गोष्ट करु शकत असेन, तर का करायची नाही?’