महापुरुष, संत, कवी हे जन्मावे लागतात, ते घडविता येत नाहीत असे आपण समजतो. हा समज खोटा ठरविणारे आपल्याकडील जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे संत तुकाराम महाराज!
तुकोबा एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाई हीदेखील गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला.
या अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले. भगवद्भक्तीची पताका खांद्यावर घेऊन आसमंतात जनजागृतीचे वादळ निर्माण केले.
हे वादळ साडेतीनशे वर्षे झाली तरी अजूनही शमलेले नाही. तुकोबांचे अभंग वाचणारा प्रत्येकजण या वादळाने झपाटला जातो. तुकोबा वामनाप्रमाणे सारी भूमी पादाक्रांत करतात आणि आकाशालाही गवसणी घालतात. सागराचा ठाव घेणारी आणि हिमालयाच्या उंचीला स्पर्श करणारी अशी तुकोबांची लोकोत्तर प्रतिभा आहे. चारचौघांप्रमाणे सामान्य जीवन वाट्याला आलेले असूनही तुकोबांनी आपत्तींनी घेरलेल्या जगण्यातील वेगळा अर्थ सर्वांना समजावून सांगितला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दांतून देत असतानाच भक्तीचे सहस्यही उलगडून दाखविले.
संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करुन देणारे तुकोबा या गुणविशेषांत केवळ महादेवाशीच तुलना होऊ शकेल, असे महान संत आहेत.
[…] संत तुकाराम महाराज पाचशे वर्षापूर्वी आर्थिक नियोजनाचा गुरुमंत्र अवघ्या आठ शब्दांत सांगून गेले आहेत. तो म्हणजे, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी”. याचा अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवावा आणि तो योग्य विचार करून, निरपेक्ष वृत्तीने खर्च करावा. तुकाराम महाराज खरोखरच द्रष्टे होते, कारण तेव्हापासूनच पाचशे वर्षांनंतर या भूमीवर क्रेडिट कार्ड, ई.एम.आय नावाचे एक ‘अस्वल’ धुमाकूळ घालणार आहे, हे त्यांना तेव्हाच दिसत असले पाहिजे ! […]