गुढीपाडवा व कथा

Published by Kalnirnay on   March 27, 2017 in   Festivals
Spread the love

आपल्याकडे प्रत्येक वर्षाला एक नाव आहे. प्रभाव, विभव, शुक्त, प्रमोद अशी ही साठ नावे असून, ही नावे पुन : पुन्हा त्याच क्रमाने येत असतात. म्हणजे पहिले संवत्सर प्रभव आणि साठावे क्षय. तर क्षय हे साठावे नाव झाल्यानंतर पुन्हा पहिले प्रभव. अशा रीतीने हे संवत्सरनामचक्र पुन : पुन्हा फिरत असते. सांप्रत गुढीपाडव्यापासून या चक्रातील एकतिसावे ‘हेमलंबी’ नावाचे संवत्सर गुढीपाडवा सणास सुरू होत आहे.

नारद मुनीना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्यापताका उभारून आनंदोत्सव साजरा केला, अशी कला आहे. त्या वेळेपासूनच या नवीन संवत्सराचे स्वागत करताना घराबाहेर एक उंच गुढी आकाशात उभारण्याची परंपरा सुरू झाली. बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून तिच्यावर रेशमी वस्त्र आणि चांदीचे, तांब्याचे वा पितळेचे भांडे उपडे ठेवून तिला फुले वाहून काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे जग निर्माण केले आणि कालगणनाही सुरू केली, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात शेवग्याची लांब काठी आणून तिला तेल लावून पाण्याने न्हाऊ घालावयाचे आणि त्या काठीवर गुढी उभारावयाची अशीही प्रथा असल्याचे सांगतात.

महाभारतात एक कथा आहे. चेदी राजा वसू जंगलात गेला आणि त्याने कठोर तप आरंभिले देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसूला यशोदायी अशी वैजयंतीमाला दिली, तसेच अखंड भ्रमंतीसाठी एक विमान आणि राज्यकारभार सुरू करण्यासाठी राजदंडही दिला या दैवी प्रसादाने वसू आनंदित झाला आणि भारावूनही गेला. त्याने त्या राजदंडाच्या एका टोकाला जरीचे रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सोन्याचा चंबू बसविला आणि त्याची पूजा केली हेच आजच्या गुढीचे मूळ स्वरूप म्हटले पाहिजे. हा वर्षप्रतिपदेचा उत्सव नव्या वर्षाचा प्रारंभ करणारा असल्यामुळे हा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष आनंदात जाते, अशी समजूत आहे. आपली प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना याच दिवसापासून सुरू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येस चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात. आपण दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापासून मानतो.

ख्रिस्ती कालगणना दिवसाचा प्रारंभ मध्यरात्री बारा वाजल्यापासून मानते. तर इस्लामी कालगणना दिवसाचा प्रारंभ सायंकाळपासून मानते. आपला दिवस हा सूर्याच्या उदयाबरोबर सुरू होतो. त्यामुळे आपल्या दिवस प्रारंभास एक नैसर्गिक अधिष्ठान मिळालेले आहे. आपल्याकडे वाराच्या सुरुवातीला त्या वाराच्या देवतेचा पहिला होरा असतो. होरा म्हणजे ६० मिनिटे म्हणजे अडीच घटका, प्रत्येक घटका २४ मिनिटांची म्हणूनच अडीच घटकांचा १ तास. या तासाला इंग्रजीत ‘ HOUR ‘ म्हणतात? तो शब्द ‘ होरा ‘ वरूनच आलेला आहे. होरा म्हणजे अहोरात्र या चार अक्षरी शब्दातील मधली दोन अक्षरे. हजारो वर्षांपासून प्रचलित असलेल्या आपल्या कालगणनेने खगोलीय चंद्र-सूर्याच्या स्थितीची सूक्ष्मता अधिकाधिक सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा एक प्रकारे आपल्या अभिमानाचा विषय आहे.

शालिवाहन राजा व शक 

या दिवसापासून ज्याचा शक सुरू होतो, तो राजा शालिवाहन हा पैठण येथे कुंभाराच्या वस्तीत वाढला. त्याने आक्रमक शकांना पराभूत केले आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ त्याने जी नवी कालगणना रूढ केली त्याला शक असेच नाव दिले.  शक हा शब्द संवत्सर या अर्थाने रूढ झाला. हा शालिवाहन राजा महाराष्ट्रीय होता. त्याचा शक आसेतुहिमाचल सर्वत्र चालतो. पंचांगगणितातील महत्त्वाची कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित आहेत. शालिवाहन शकाच्या प्रारंभीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्राने किष्किंधावासीयांना वालीच्या छळातून मुक्त केले असे एक कथा सांगते. तर दुसऱ्या कथेप्रमाणे प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत आले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. एक गोष्ट खरी, प्रभू रामचंद्रांची जी रूढ आरती आहे त्यात  आनंदाची गुढी घेऊनिया आला असा एक संदर्भ आहे? या गुढीचा गुढीपाडव्याशी काही संबंध असेल काय?

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)