एकनिष्ठ बलवंत मारुती

चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी झाली की, चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्रीहनुमानाची जन्मतिथी येते. राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर प्रत्यक्ष अग्निदेवाने दशरथाच्या पदरात जे पायसदान टाकले त्याचा काही अंश एका घारीने पळविला. तो हनुमानाची माता अंजनी हिच्या ओंजळीत पडला. तो तिने प्राशन केला आणि त्यायोगे मारुतिरायाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्राचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या जन्मापूर्वीपासूनचे आहे आणि ते नाते अनंत काळपर्यंत चिरकाल टिकणारे आहे.

मारुतीचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला. मारुतीचा जन्म भारतात सर्वत्र साजरा केला जातो. मात्र हिंदुस्थानच्या काही भागात विशेषत: दक्षिणेत मारुतिजन्म आश्विन कृष्ण चतुर्दशीला  (म्हणजे ज्या दिवसाला ‘कालीचौदस’ म्हणून ओळखले जाते त्या दिवशी) साजरा केला जातो. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासून कीर्तन सुरू होते आणि सूर्योदयाच्या वेळी मारुतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक गावात श्रीरामचंद्राचे आणि श्रीमारुतिरायाचे देवालय बहुधा असतेच. मारुतीची अनेक स्तोत्रे उपलब्ध आहेत. त्यातील काही मंत्ररूपात आहेत. संस्कृतमध्ये असलेले ‘पंचमुखी हनुमान स्तोत्र’, ‘वडवानल हनुमान स्तोत्र’ ‘एकादशमुख हनुमान स्तोत्र’ अशी स्तोत्रे विशेष प्रचलित आहेत. मराठीत श्रीसमर्थ रामदासस्वार्मीनी तेरा प्रकारची भीमरूपी स्तोत्रे लिहिली आहेत.

मारुती हा मुळात सुग्रीवाचा सेनापती, सुग्रीवाचा मित्र. पुढे सीतेचा शोध करायला त्याने रामाला बहुमोल मदत केली. मारुतीची मदत नसती तर सीतेला परत रामाकडे आणणे तर सोडाच, पण सीतेचा शोधसुद्धा लागणे अवघड होते. समुद्र पार करून लंकेत जाऊ शकेल, असा हनुमान हा एकच वीर आहे, असे जांबुवंत म्हणतो त्यात फार मोठा अर्थ आहे.

लंकेत जाण्यासारखे सामर्थ्य त्या काळात तरी दुसऱ्या कोणापाशी नव्हते. रावणाच्या राज्यात एकटे जाण्याइतपत मारुतीचे मनोधैर्य प्रभावी होते. त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकणाऱ्या कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्याची त्याची तयारी होती. सीतेपर्यंत मारुती पोहोचला, त्याने रामाची अंगठी तिच्या दृष्टीस पडेल असे केले. सीतेच्या अत्यंत मलूल आणि प्रतिकूल मनःस्थितीत मारुतीने तिला केवढा तरी मोठा आधार दिला. हे सर्व त्याच्यापाशी तसे सामर्थ्य होते आणि ते सामर्थ्य चांगल्या कामासाठी उपयोगात आणण्याचा त्याचा संकल्प होता म्हणून घडले. मारुतीला स्वतः ला काहीच नको होते. त्याला घर ना दार, ना बायको ना संसार म्हणूनच तो सर्व सामर्थ्यानिशी आधी सुग्रीवाच्या आणि नंतर रामाच्या मागे भक्कमपणे उभा राहिला. त्याच्या नावाचा उच्चार करताना ‘ रामभक्त, ‘ रामदूत ‘ अशी विशेषणे लावली जातात. त्याने रामाच्या जीवनाशी आपल्या जीवनाचा प्रवाह जणू एकरूप करून टाकला होता. त्याला वेगळे अस्तित्वच नव्हते. कोणत्याही मोठ्या अडचणीच्या प्रसंगातून रामाला कसे बाहेर काढावयाचे, हा एकच विचार मारुतीच्या मनात घोळत असे आणि त्यामुळेच की काय मारुतीबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भक्तिभाव सर्वत्र आढळून येतो.

समर्थ रामदासस्वामी व अकरा मारुती

अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैनिकांच्या दंडावर मारुतीची प्रतिमा असलेला ताईत बांधावा, असे समर्थ रामदासस्वामींनी सांगितल्याचे नमूद आहे. रामदासस्वामींनी महाराष्ट्रात जागोजागी मारुतीची मंदिरे उभारली. तसेच त्या काळात महाराष्ट्रात खूप लोकांनीही आपणहून मारुतीची मंदिरे बांधली. समर्थ रामदासस्वामींनी स्थापन केलेले अकरा मारुती तर प्रसिद्धच आहेत.

समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीचे वैशिष्ट्य असे सांगतात की, त्या मारुतीच्या मूर्तीच्या पायाखाली राक्षस असतो. मारुती राक्षसावर पाय ठेवून उभा राहिलेला दिसतो. समर्थांना मारुती हवा होता तो शत्रूच्या दमनासाठी. आक्रमकावर विजय मिळविण्यासाठी आणि म्हणून समर्थांनी या राक्षसमर्दन मारुतीची स्थापना केली असावी.

Eleven Maruti temples in Maharashtra

बलोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक आहे, हे जसे समर्थांना अभिप्रेत होते तसेच रामाला मोठे करण्यासाठी हनुमानाने स्वतः च्या सर्व आशाआकांक्षांकडे पाठ फिरवून आपले संपूर्ण जीवन त्याच्या चरणी अर्पण केले. तोच आदर्श नजरेसमोर ठेवून स्वार्थाची कोणतीही भावना मनात न ठेवता महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे म्हणून लढणाऱ्या वीरांनीही व्यक्तिगत आशाआकांक्षांच्या मागे न लागता त्यागी भावनेने वागावे, स्वामीनिष्ठ मारुतीचा आदर्श सर्वांनी मनासमोर ठेवावा, असे तर समर्थांना सुचवावयाचे नसेल?

श्री हनुमान स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥

ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥

कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥

अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (धर्मबोध व देवाचिये व्दारी पुस्तकामधून)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.