तंबाखूचे सेवन आणि परिणाम

Spread the love

“गेली ३० वर्षे मी सवयीचा गुलाम होतो! महिन्याच्या सुरुवातीला आणायच्या वाणसामानाच्या यादीबरोबर मी माझा महिन्याला लागणारा ‘जीवन छाप’ विड्यांचा स्टॉक आणत असे. सिगारेटच्या पाकिटावरचे वैधानिक इशारे टाळायला मी हा पर्याय निवडला आणि सिगारेट सोडून विड्या ओढायला लागलो. खर्चही थोडा कमी झाला, पण आज मात्र दोन जिने चढून येतानाही दम लागतो. डॉक्टर फार उशीर झाला का?”

दिवसाला विड्यांची तीन पाकिटे संपविणारे आमचे पेशंट तीन आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून घरी गेले. घरीदेखील त्यांना काही काळ तरी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कृत्रिमरित्या द्यावा लागणार होता. मात्र पुढील महिन्यात ते जेव्हा फॉलो- अपकरिता आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आगळा आनंद दिसत होता. ते सांगत होते तीन दशकांची सवय तीन आठवड्यांत सुटली असे वाटते. रोज औषध घ्यायच्या आधी कपाटावर ठेवलेल्या गेल्या महिन्यांच्या सिगारेट -विडी आणि तंबाखूच्या स्टॉककडे बघतो आणि मग इथे शिकविलेले दीर्घ श्वसनाचे व्यायाम करायला सुरुवात करतो. सात- आठ वेळेला आलेली तंबाखूची ‘ तल्लफ ‘ पुन्हा हॉस्पिटलची वाट धरायला लावणार नाही ना? हा विचार येताच औषधे घेऊन एक जिना उतरून पुढे चालायला लागतो.”कोणतीही  ‘ निकोटिन रिप्लेसमेंट ‘ थेरपीमधील औषध न वापरता ‘ सवयीचे गुलाम ‘ असलेल्या आमच्या पेशंटनी त्यांच्या मनोनिग्रहाने महिनाभर का होईना सवयीवर विजय मिळविला होता आणि त्यांचा अपेक्षित परिणाम म्हणून त्याची फुप्फुसक्षमता १०० CC ने वाढलेली दिसत होती. ऑक्सिजनची पातळी देखील सुधारत होती आणि २०१३ मध्ये अंगी बाणलेला आरोग्याचा निग्रह त्यांना २०१५ साली ‘कालनिर्णय आरोग्य’ तर्फे अनारोग्य झुगारण्याचा मूलमंत्र म्हणून आम्ही लिहिणार आहोत असे जेव्हा सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांना धूम्रपानाची ‘ सवय ‘ कशी लागली याची गोष्ट आम्हाला सांगितली.

” कॉलेजमध्ये असताना सिनेमा पाहताना ‘ फिक्र को धुए में उडाता चला गया ‘ म्हणत जाणारा हिरो प्रत्यक्षात स्वतःला लागलेली काळजी, निराशा घालवायला तंबाखूतून मिळणाऱ्या निकोटिनच्या झुरक्यातून तात्पुरती का होईना सुटका मिळवून देतो असे वाटले आणि मग एकच्या दोन, दोनाच्या चार आणि अशा दिवसाला १०० असे त्यांचे ‘ चेन स्मोकर ‘ मध्ये रूपांतर झाले आणि मग ब्राँकायटिसमुळे (COPD) हॉस्पिटलमध्ये राहायची वेळ आली. ‘

तंबाखू व विडी 

आपल्या देशात ‘ तंबाखू ‘ हा कुंपण घालण्यासाठी वापरला जाई. जनावरे तंबाखू खात नाहीत, पण पाश्चात्य देशातून आलेली विलायती सिगार, सिगारेट हा एक स्टेट्स  सिम्बॉल म्हणून भारतात आयात झाली. १७ व्या शतकात विडीची उत्पत्ती गुजरातमध्ये तेंदूच्या पानात वळून वापरण्यात आल्याचे सांगितले जाते. १९६० च्या सुमारास पॉवर लूम्स आल्या व मोठ्या प्रमाणात हातमागावर काम करणारे कारागीर विड्या वळण्याच्या क्षेत्रात आले आणि मग तेलंगणा राज्यापासून जबलपूरपर्यंत सर्वत्र हा व्यवसाय फोफावला आणि जागोजागी विड्या, सिगारेट, चिरूट, तंबाखूची उपलब्धता मुबलक प्रमाणात झाली.

दुष्परिणाम

तंबाखूचे सेवन हे सुरुवातीस हुक्क्याच्या स्वरूपात होत होते. वापरायला सुलभ व्हावे, म्हणू विडीचा जन्म झाला. गुजरात राज्यात जन्मलेली विडी जवळजवळ १५० वर्षे अनारोग्यास कारणीभूत ठरते आहे. त्यातून निर्माण होणारा तंबाखूचा धूर श्वसनदाह निर्माण करतो व विविध श्वसनरोगांना आमंत्रण देतो. यात ब्राँकायटिस, इंटरस्टिशिअल लंग डिसीज, फुप्फुसाचा कर्करोग तसेच हार्ट अॅटॅक, पक्षाघात यातही धूम्रपान हे एक महत्त्वाचे कारण ठरते. तंबाखूच्या धुरात २५० हून अधिक घटक असून त्यांचे अपूर्ण विघटन झाल्याने आपल्या रक्तात शोषलेले कित्येक घटक अनारोग्यास आमंत्रण देतात. दुष्परिणाम दिसायला काही वर्षांचा काळ जावा लागतो आणि त्यामुळेच की काय वैधानिक इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
भूक मंदावते म्हणून वजन आटोक्यात ठेवायचा एक मार्ग म्हणून  तरुण-तरुणी स्वतःची फसवणूक करून घेत एखादी बघावी पिऊन म्हणून झुरका घेतात आणि विशेषत: जेव्हा भावी माता धूम्रपान टाळू शकत नाहीत तेव्हा मात्र त्या स्वत:बरोबर एका अश्राप जिवालाही जन्मायच्या आधीच वाढ खुंटायला कारणीभूत ठरतात. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम हे शरीरातील सर्वच मुख्य क्रियांना त्रासदायक ठरू शकतात. पण प्रामुख्याने हृदयविकार व श्वसनदाह हे विशेष महत्त्वाचे.
 ‘ कालनिर्णय आरोग्य ‘ आपला धूम्रपान सोडण्याचा निग्रह केवळ संकल्प न राहता प्रत्यक्षात आणण्याकरिता आठवणीचे द्योतक ठरू दे.

 – डॉ. अमिता आठवले (चेस्ट फिझिशियन) । कालनिर्णय आरोग्य । सप्टेंबर २०१५