मुलांचा डबा – काय देऊ?

Spread the love

“आज डब्यात काय द्यावे ?”

जागरुक गृहिणीला एकटीलाच रोज पडणारा हा प्रश्न! काय रांधायचे आणि काय बांधायचे, हा विचार आदल्या रात्री केलेला असला तर ठीकच! नाहीतर गडबड होत राहते.

आमच्या लहानपणी भाजीपोळी किंवा पोळीचा लाडू हे दोनच पर्याय होते. पराठे माहीत नव्हते आणि पुऱ्या या फक्त सणावारी किंवा प्रवासासाठी! पण आता खाण्यापिण्याचे प्रकार अनंत, आवड-नावड जोपासलेली आणि भारतीय, विदेशी पाककलेचे बहुरंगी धडे टीव्हीवर चालू असतात. त्या आकर्षक महागड्या अनोख्या पदार्थांपुढे आपली पोळी भाजी अगदीच फालतू? टाकाऊ वाटायला लागते. पण हाच सर्वांत सोपा, पोटभरीचा, पौष्टिक आणि परवडणारा प्रकार आहे. जे घरासाठी बनवायचे तेच डब्यांत भरायचे, असा सरधोपट खाक्या असावा. मुलांची पेटपूजा साधी असली की, ती सहसा बाधत नाही. पण तसे होत नाही.

मुलांचे डबे आकर्षक, आतले पदार्थ हटके असावे लागतात. छोट्या कुटुंबातून, छोट्या मुलांसाठी वेगळे जेवण बनवले जात नाही. त्यांच्या चिमुकल्या शरीरावर आपण अकारण अत्याचार करतो आहोत हे पालकांना उमगत नाही.

मूल शाळेत जायला लागले की, डबा व बाटलीची पिशवी खांद्याला लटकते. अगदी प्री – नर्सरीपासून ते अगदी पीएच डी. होईपर्यंत किंवा शिक्षण संपेपर्यंत! अनेक शाळांतून मुलांनी आपापल्या हातातूनच डबा व पाण्याच्या बाटल्या आणायला हव्यात, असा नियम आहे. त्यामुळे मुलांना स्वावलंबन जमायला लागते असे समजायचे!

प्री – नर्सरीचा डबा


प्री – नर्सरीतल्या मुलांना डबा म्हणजे भातुकलीचा! तूप – मीठ लावलेल्या लाह्या, चुरमुरे, कोरडी भेळ, शंकर पाळे असे बोटांनी उचलून खाता येतील असे पदार्थ द्यावेत. काही महागड्या शाळांतून फळांचे रस, शिरा, उपमा, लाडू असे खाऊ दिले जातात. कुणाचा वाढदिवस असला की, त्यानिमित्त कपकेक, बटाटा चिप्स, लेमन ड्रॉफ, लाडू, वड्या हे वाटप होते. महागडी मेवामिठाई मिळत राहतेच. शाळेच्या डब्यात रसगुल्ले, गुलाबजाम असे रसभरीत पदार्थ टाळावेत. त्यापेक्षा खोबरापाक, दुधीची वडी, बेसनाची वा रव्याची वडी द्यावी. हल्ली काजूकतलीची चलती आहे. त्यापेक्षा पेढे बरे, वाटायला सुटसुटीत आणि उरले तरी टिकतात. मुलांना सगळे पदार्थ खायची सवय हळूहळू करावी. येनकेनप्रकारेण सर्व तऱ्हेच्या भाज्या, कडधान्ये, फळे ही आलटून पालटून द्यावीत. जरा मोठ्या मुलांच्या शाळेत जसे होमवर्क असते तसे आईनेही महिना भराचे मेनूकार्ड बनवावे. मुलांना विचारून, सांगून ठरवावे. तेंडुलकरचा डबा असाच असायचा म्हटले की, मुले आवर्जून डबा संपवतात.

माध्यमिक शाळेसाठी डबा


माध्यमिक शाळांतल्या मुलांना जरा जास्त डबा लागतो. उभ्या-उभ्या किंवा घाईघाईत खायचे व हात धुवून लगेच खेळायला जायचे असते. त्यामुळे त्यांचे डब्याकडे कमी लक्ष असते. तरीदेखील पोटभरीचा डबा हवा व काहीतरी नंतरही तोंडात टाकण्याजोगे हवेच असते. बिस्किट, नुडल्स ह्यापेक्षा घरगुती चिवडा, शेव, मुटकुळी असे काहीतरी मैदा, डालडा नसणारे पदार्थ असावेत. लहान केळे, पेरू, चिकू, हेही डब्यात द्यायला सोपे असते. उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचे काप, गाजराचे काप, ४ – ५ द्राक्षे किंवा सुका मेवा द्यावा. डब्यात लहान कापडी नॅपकीन किंवा सरळ वर्तमानपत्राचा तुकडा पेपर नॅपकीन म्हणून ठेवावा. कारण नळावर हात धुण्यालासुद्धा मुलांची रांग असते. अर्ध्या तासांत डबाही खायचा नि हात धुवून आवरायचे तेव्हा घाई होते. दुपारच्या डब्यात पोळीभाजीचा रोल- त्याला फ्रँकी म्हटले आणि जरा चिनी – थाई – पंजाबी साज चढवला की काम फत्ते!

भाजणीचे वडे, थालीपीठ, तांदळाच्या पिठाचे तिखट वडे हेही पोटभरीचे असतात. बरोबर छोट्या डबीत आंबटगोड लोणचे देता येते. चायनीज फ्राइड राईस व भाज्या घालून नूडल्स वा पिझ्झा हे अगदी प्रेमाचे खाणे असते. कधी कधी अर्धा दिवस किंवा सकाळची लवकरची शाळा असेल तेव्हा उपमा, फोडणीची पोळी ही रात्रीच करून फ्रीजमध्ये ठेवावी. सकाळी तयार डबा कापडी पिशवीत दिला की, तो तीन तासांनंतर रूम टेंपरेचरला येतो. उकडलेली अंडी, हिरवी चटणी व सॉस लावून दोन पोळ्यांची तूप लावून गुंडाळी करावी. मात्र त्याचे दोन तुकडे करून मध्ये पाचर म्हणून काहीतरी कापटी वा पोळीचा तुकडा ठेवावा.

कधीतरी सँडविच, आलूटिक्की व जोडीला दहीभात, दहीपोहेही बदल म्हणून द्यावेत. तांदळाच्या पिठाची पानगी, दशमी किंवा उकडीची भाकरी गार झाल्या तरी चांगल्या लागतात. सोबत भाजी, पिठले किंवा उसळ मुलांच्या आवडीची द्यावी. किशोरवयीन मुलांना व्यवस्थित डबा लागतोच. तीन-चार पोळ्या, केळे, भाजी, चटणी, मुरंबा किंवा तूप साखरेचे रोल हे सोपे जमणारे पूर्णान्न! पण मुलींची मागणी वेगळी आणि मुलांची आवड वेगळी!डबा लहान, सुटसुटीत हवा असेल तर पोळीचा लाडू मुटके, शेगोंळ्या, रवा ढोकळा, उपमा या गोष्टी जमतात, पण सकाळच्या घाईत कौतुकी डबे होऊ शकत नाही. पण एखादे वेळी लाड पुरवावेत.

आठवड्यातील वार व डबा:

सोपा सोमवार

मराठी मंगळवार

वेडा बुधवार

गोमटा गुरुवार

शाही शुक्रवार

शहाणा शनिवार

अशी वर्गवारी करावी. पनीर, भेळपुरीची चटणी हे हुकमी साहित्य संध्याकाळसाठी ठेवावे. खीर, मिठाई, चमचमीत पदार्थ शाळेत देऊ नयेत. जर मुलांचा अभ्यास नीट झालेला नसेल, बोलणी खावी लागली असली, तरी डबा नीट खाल्ला जात नाही. पण अशा वेळी त्याचा बाऊ न करता साधेच पण आवडीचे रात्रीचे जेवण करावे. तिखटमिठाच्या पुऱ्या, थेपले, पराठे, रोट्या गरम वाढल्या की मुले आवडीने खातात. शक्य असल्यास सकाळीच मऊ भात, वरण – भात, पेज किंवा मुगाची खिचडी नाश्त्याला देता आली तर त्यांची वृत्ती शांत राहील. चणेदाणे, कुरमुरे हे येता -जाता तोंडात टाकायला खाण्याची सवय लावावी. शक्यतोवर बेकरीचे पदार्थ, महागडी बिस्किटे, चॉकलेटस ही टाळावीत. जितके महाग तितके चांगले हा श्रम घालवावा. दरमहा डॉक्टराकडे मुलांना न्यायला लागू नये, हा हेतू मनात कायम धरावा.

आहारातून औषध द्यावे, म्हणजे मुलाच्या चेहऱ्यावर टवटवी दिसेल. तजेला जाणवेल आणि हे तुमचे गुप्त धन आहे. घरात कुणी आजारी पडू नये, कारण त्याचा मनस्ताप सर्वात जास्त पालकांना जाणवतो.  ‘ तुमच्या घरी नसावा दुखणेकरी, ही सदिच्छा!’ कारण जर मुले आजारी पडली तर आईवडील हवालदिल होतात. म्हणून जागरूक गृहिणी नेहमीच काळजी घेतात. तुम्हीही घेत असालच, तरीही हा आठवलेला सल्ला!


 – स्नेहलता दातार | कालनिर्णय आरोग्य | जून २०१७